अहमदची पत्रिका
ह्या दैनिक अनिवार्य प्रार्थना, इतर काही विशिष्ट प्रार्थनासह एकत्र म्हणाव्यात, जशा, आरोग्याची प्रार्थना, अहमदची पत्रिका यांच्यात बहाउल्लाह कडून विशेष प्रभाव व विशेषता बहाल करण्यात आल्या आहेत आणि म्हणून त्यासारख्या मान्य करण्यात याव्यात आणि भाविकांनी निर्विवाद श्रध्दा व आत्मविश्वास यांसह त्यांचे पठन केले पाहिजे, म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांनी परमेश्वराशी अधिक जवळीकीने तन्मय व्हावे आणि त्याचे कायदे व प्रमाणे यांच्याशी अधिक पूर्णत्वाने स्वतःस परिचीत करावे.
-शोघी एफेंदी
परमेश्वर सम्राट, सर्वज्ञ, सर्व बुद्धिमान आहे!
ऐका, सनातनाच्या वृक्ष शाखांवर बसून स्वर्गीय कोकिळा सुस्वर पावन सुरांनी ईश्वर सामिप्याची आनंद-वार्ता निष्ठावंतांना प्रगट करीत, भाविकांना दैवी ऐक्यामध्ये, औदार्यसंपन्न परमेश्वरी सान्निद्याच्या दरबाराकडे बोलावीत, अतुल्य वैभवसंपन्न सम्राट परमेश्वराने प्रगट केलेल्या संदेशाची विभक्त जनांना माहिती देत, पावित्र्याच्या सिंहासनाकडे आणि ह्या तेजोमय दिव्य सौंदर्याकडे आपल्या भक्तांचे मार्गदर्शन करून मधुर गान करीत आहे.
ज्याच्याद्वारे सत्य हे प्रमादापासून वेगळे ओळखले जाईल आणि प्रत्येक आज्ञेची बुद्धिनिष्ठा पारखली जाईल, असे त्या दैवीदूताच्या दिव्य ग्रंथांतून भाकित झाले, ते अत्यंत महान दिव्य सौंदर्य, निःसंशय हेच आहे. अतिउन्नत, शक्तीशाली, महान अशा परमेश्वराची सुमधूर फळे देणारा जीवन वृक्ष, निःसंशय तोच आहे.
हे अहमद! निःसंशय तो परमेश्वर आहे आणि सम्राट, संरक्षणकर्ता प्रभू, अतुलनीय, आणि सर्वशक्तीमान असा त्याशिवाय अन्य कोणी परमेश्वर नाही, आणि ज्याला अली (परम पावन बाब) ह्या नामाने परमेश्वराने पुढे पाठविले आहे आणि ज्याच्या आज्ञा आपण सर्व पाळीत आहोत, तो सत्यतः परमेश्वरीय अवतार होय, याची तू साक्ष दे.
म्हणाः हे लोक हो, वैभवसंपन्न सर्व बुद्धिमान अवताराने ‘‘बयान’’ मध्ये जे ठरवून दिले आहे, त्या परमेश्वराच्या आदेशांचे तुम्ही पालन करा. तो निःसंशय दैवी दूतांचा सम्राट, आणि त्याचा ग्रंथ मातृ-ग्रंथ होय हे तुम्ही केवळ जाणले आहे.
याप्रमाणे ह्या बंदिवासातून दैवी कोकिळा त्याचीच हाक तुम्हासाठी प्रगट करते. त्यास केवळ हाच स्पष्ट संदेश द्यावयाचा आहे. जो कोणी वांच्छील त्याने ह्या उपदेशाकडे दुर्लक्ष करावे आणि जो कोणी वांच्छील, त्याने आपल्या प्रभु-मार्गाची निवड करावी.
हे लोक हो, तुम्ही ही दैवी वाणी नाकाराल तर कोणत्या प्रमाणाने तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवली आहे? हे मिथ्या लोकहो, आपले प्रमाण सादर करा. नव्हे, ज्या एकमेवाच्या हाती माझा आत्मा आहे, त्याची शपथ ते असे करण्यास समर्थ नाहीत आणि जरी ते एकमेकांस साह्य करण्यासाठी एकत्र आले, तरी कदापि समर्थ होणार नाहीत.
हे अहमद! मी उपस्थित नसेन तेव्हाही माझ्या कृपाप्रसादास विसरू नकोस. तुझ्या दिवसांमध्ये माझ्या दिवसांची आणि ह्या दूरस्थ बंदिवासातील माझ्या पीडा आणि हद्दपारीची आठवण ठेव. आणि शत्रुंच्या तलवारींनी तुझ्यावर हल्ल्यांचा वर्षाव केला आणि सर्व स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या विरूद्ध उभी ठाकली, तरी माझ्या प्रेमात तू इतका निश्चल रहा की तुझे अंतःकरण किंचितही विचलित होणार नाही.
तू माझ्या शत्रूंसाठी अग्नि-ज्वाला आणि माझ्या प्रियजनांसाठी चिरंतन जीवनाच्या नदीप्रमाणे हो आणि जे संशयी आहेत, त्यांच्यापैकी होऊ नकोस.
आणि माझ्या मार्गावर यातनांनी अथवा माझ्यासाठी अवमानांनी तुला ग्रासले तरी, त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस.
ईश्वरावर, तुझ्या परमेश्वरावर आणि तुझ्या पूर्वजांच्या स्वामीवर विश्वास ठेव. कारण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी ईश्वराला पाहून आणि त्याचे संगीत स्वतःच्या कानांनी ऐकून त्याला ओळखण्याच्या इच्छेअभावी लोक भ्रमाच्या मार्गावर भटकत आहेत. असे आम्हाला ते लोक आढळून आले आहेत, जसे तूही त्यास साक्षी आहेस.
ह्याप्रमाणे त्यांच्या अंधश्रद्धा ते स्वतः व त्यांची आपली अंतःकरणे यांच्यामध्ये आवरणे बनली आहेत आणि त्यांनी सर्वश्रेष्ठ व महान अशा परमेश्वराच्या मार्गापासून त्यांना वंचित ठेवले आहे.
निःसंशय जो ह्या दिव्य सौंदर्यापासून मुख वळवतो, तो भूतकाळातील दैवी दूतांपासूनही दुरावला आहे व तो अनादिकाळापासून अनंत काळापर्यंत परमेश्वराठायी अहंकार प्रदर्शित करीत आहे, ह्याबद्दल तुम्ही स्वतःची निःसंशय खात्री बाळगा.
हे अहमद, या पत्रिकेचे उत्तम अध्ययन कर. ती सुस्वराने म्हण आणि आपणा स्वतःस तिच्यापासून वंचित ठेवू नकोस. कारण, जो ही पत्रिका सुस्वर म्हणतो, त्यास शंभर हुतात्म्यांचे पारितोषिक आणि दोन्ही जगांतील सेवा ही निःसंशयपणे ईश्वराने नियोजित केली आहे. आमच्या वतीने एक कृपाप्रसाद आणि आमच्या सान्निध्यापासून दया म्हणून ही वरदाने आम्ही तुला प्रदान केली आहेत, ज्यायोगे अत्यंत कृतज्ञ लोकात तुझी गणना होवो.
परमेश्वराची शपथ! जो कोणी पीडाग्रस्त तथा दुःखी असेल, तो ही पत्रिका पुर्णतः निष्ठेने पठन करील, तर परमेश्वर त्याचे दुःख निवारण करील, त्याच्या अडचणी सोडवील आणि त्याच्या यातना दूर करील.
तो निःसंशय, दयाळू व कृपाळू आहे. सर्व जगांचा स्वामी अशा परमेश्वराचे स्तवन असो.